• Mitra

Shitala - Review by Dr. Pareexit Shevde - Tarun Bharat

Updated: Mar 23, 2021


शीतला : लसीकरणाचा भारतीय इतिहास देशात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. स्वतः मा.पंतप्रधानांनी लस घेऊन नारळ वाढवून झाला आहे. लसीकरण ही आधुनिक वैद्यकाची देण असल्याचे आपण सर्वत्र वाचत असतो. मात्र ऐतिहासिक संदर्भ पाहिल्यास एक वेगळेच सत्य आपल्यासमोर येते. आयुर्वेदात सर्पविषाच्या उपचारांत डोक्यावर काकपद छेद घेऊन थेट रक्तप्रवाहात औषध सोडावे असे वर्णन आढळते. सूचिभरण रस अर्थात सुईने टोचायच्या औषधांचे वर्णनही काही आयुर्वेदीय ग्रंथांत आलेले आहे. कौटिलीय अर्थशास्त्रात वर्णित 'विषकन्या' प्रकरणदेखील लसीकरणाच्या मूलभूत सिद्धांतावर आधारित असलेलेच आहे. केवळ साहित्यिक संदर्भच नव्हे तर भारतीयांना प्राचीन काळापासूनच लसीकरण हा उपाय ज्ञात होता आणि त्याचे प्रचलनही भारतात होते हे दाखवणारे ऐतिहासिक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. देवीच्या रोगाला आयुर्वेदात 'शीतला' असे म्हटले असून त्याचे वर्णनदेखील आयुर्वेदात सापडते. विशेषतः बंगाल ते नेपाळ या प्रदेशात शीतलेच्या उपचारांचे समकालीन संदर्भ आढळतात. (Nicholas, Ralph W. “Th e Goddess Śītalā and Epidemic Smallpox in Bengal.” Th e Journal of Asian Studies, vol. 41, no. 1, 1981, pp. 21–44.)

१७५४ मध्ये रेव्हरंड चार्ल्स काईस यांनी आपल्या डी. अम्सटरडॅम नामक भारतात वास्तव्य केलेल्या मित्राला याबाबत विचारणा केली असता; बंगाल प्रांतात शुद्ध केलेले काटे आणि काही पट्टबंधाच्या साहित्यासह देवीची लस तेथील रहिवासी देत असल्याची माहिती त्याने दिली. आपल्या परिचयाच्या एका ब्रिटिश महिलेने आपल्या मुलांना ही लस दिल्याची माहितीदेखील त्याने नमूद केल्याचे रेव्हरंड चार्ल्स यांनी आपले पुस्तक Essai Apologetique मध्ये नमूद केले आहे. अमेरिकन डॉक्टर जेम्स कर्कपॅट्रिक यांनी An analysis of inoculation या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात नमूद केले आहे. मात्र त्यातही याचे श्रेय स्थानिक चिकित्सकांचे नसून त्या ब्रिटिश महिलेचे आहे; जिने आपल्या मुलांवर हे प्रयोग करू दिले - अशी मखलाशी करायला डॉ. जेम्स विसरलेले नाहीत! १० फेब्रुवारी १७३१ डॉ. ऑलिव्हर कॉल्ट नामक ब्रिटिश डॉक्टर असे लिहितो की किमान १५० वर्षांपासून बंगाल सुभ्यातील ब्राह्मणांकडून तेथील रहिवाशांना देवीची लस दिली जाते. तिला स्थानिक भाषेत 'टिका' असे म्हणतात! आजही लसीला हिंदीत टिका असेच म्हटले जाते. १७९७ साली एडवर्ड जेन्नरने देवीवरील लस शोधली आणि क्रांती घडल्याचे आपण वारंवार वैज्ञानिक साहित्यात वाचतो. त्यांचे श्रेय नाकारण्याचा प्रश्न नाही. प्रत्यक्षात मात्र त्यापूर्वीपासूनच भारतात देवीचे लसीकरण केवळ ज्ञातच नव्हे तर सुरुदेखील असल्याचे वरील समकालीन संदर्भ उपलब्ध आहेत. सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते याचे हे प्रमाणच नव्हे काय? हे सारे संदर्भ नमुद करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियास्थित लेखिका मित्रा देसाई यांचे येऊ घातलेले 'शीतला' हे इंग्रजी पुस्तक होय. प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक वाचण्याचे भाग्य लाभलेल्या काही मोजक्या वाचकांपैकी मी एक। लेखिका मित्रा देसाई या मूळ सातारच्या रहिवास. लग्नानंतर त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या. कायदा, क्रिमिनल जस्टिस, इंटिरियर डिझाईन अशा विषयांमध्ये पदवी धारण करून विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणारे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व - अशी त्यांची ओळख करून देता येईल. भारतीय संस्कृती, त्यातले पुरातन शोध यांचा अभ्यास करता करता हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहोचता येईल याचा लेखिकेने ध्यास घेतला. तेजोमाया भारत नावाच्या वेबसाईट व युट्युब चॅनेल द्वारे लेखिकेने छोट्या व मोठ्या गोष्टी पॉडकास्ट, व्हिडिओ व लेखांद्वारे लोकांपुढे मांडायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टी सांगत त्यांनी थेट 'शोध सुश्रुताचा' या मालिकेपर्यंत मजल मारली. महाभारताचे गाढे अभ्यासक निलेश ओक यांच्यासह अभ्यास करून लेखिकेने आयुर्वेदीय शल्यतंत्राचे धुरंधर महर्षी सुश्रुत यांच्यावर दहा भागांची एक मालिका गोष्टी स्वरूपात मांडली. अत्यंत क्लिष्ट विषय अतिशय सोप्या शब्दात; तोही गोष्टीरुपाने व्हिडिओच्या माध्यमातून श्रोत्यांना खूप आवडला. यानंतर देसाई यांनी विविध विषय हाताळत लोकांना आपल्या संस्कृती आणि इतिहासाची समाजमाध्यमांद्वारे ओळख करून देण्याचा सपाटाच लावला ! विशेष म्हणजे लेखिका ऑस्ट्रेलियामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून काम पाहतात. त्याचवेळी हिंदू कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया, हिंदू रेसोनान्स फोरम, हिंदू स्वयंसेवक संघ कॅनबेरा अशा संघटनांमध्ये काम करतानाच भारताविरुद्ध विनाकारण चुकीची माहिती प्रसृत करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेण्याचे काम, त्या आपल्या ब्लॉग/ लेखाद्वारे करत असतात. मित्रा देसाई यांचे नवीन पुस्तक म्हणजेच 'Shitala : How India enabled vaccination'. या पुस्तकातून भारतामध्ये लसीकरणाचे तंत्रज्ञान किती पुरातन आहे याची आश्चर्यचकित करणारी माहिती रोचक पद्धतीने मिळते. भारतात पसरलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी शिकायला न जाता येणाऱ्या व घरी अडकून पडलेल्या तारा नामक युवतीच्या आपल्या 'आयुर्वेदतीर्थ' आजोबा- नानांबरोबर होणाऱ्या संवादातून ही गोष्ट उलगडत जाते. तुम्हा आम्हाला पडणारे अनेक प्रश्न ताराला पडले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष होऊन गेली तरी आपण काहीच प्रगती कशी केली नाही? एवढे मोठे pandemic थोपवण्यासाठी आपल्याकडे कसलीच व्यवस्था नसताना भारताने/आयुर्वेदाने लसीकरणाबाबत आपल्याला माहिती असल्याच्या फुशारक्या मारायचा का? अशा एक नाही अनेक प्रश्नांची हळूवार उत्तरे देत; ताराला संशोधनाची गोडी लावत, तिच्यासमोर समकालीन संदर्भ ठेवत आयुर्वेदतीर्थ नाना तिच्याशी जो हळुवार संवाद साधतात तो ओघवत्या भाषेत लेखिकेने मांडला आहे. इतिहासाशी फारकत न घेता, संदर्भांची योग्य मांडणी करत तो रोचकपणे मांडण्याच्या लेखिकेच्या कसबाचे कौतुक करायलाच हवे. मी स्वतः पुस्तक हाती पडताच एका बैठकीत वाचून काढले. पुस्तकाला जगभरात उत्तम प्रतिसाद लाभेल यात शंकाच नाही. मात्र यानिमित्ताने केवळ इतिहासात रममाण न होता; आयुर्वेदातील लसीकरण संकल्पनेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे असे एक वैद्य म्हणून राहून राहून वाटते. आजही अशा प्रयोगांना आपल्या देशात विविध Ethical committees कडून परवानगी मिळत नाही हे दुर्दैवी सत्य आहे. आयुर्वेदीय औषधी उत्पादकांचे जीव तुलनेत लहान असल्याने तेदेखील कमी पडतात. मात्र हे चित्र प्रयत्नपूर्वक पालटावे लागेल. तसे होण्यासाठी आयुर्वेदीय समाजाला प्रेरणा म्हणून तर भारतीयांना जनजागृती म्हणून 'शीतला'सारखी पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत. निलेश ओक, मित्रा देसाई, संकेत कुलकर्णी यांसारखे अभ्यासक परदेशांत राहून भारतीयांच्या माना ब्रिटिशांनी लादलेल्या गैरसमजांच्या जोखडातून मुक्त करत आहेत. त्यांना उदंड यश लाभो!

- वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति पूर्व प्रसिद्धी : तरुण भारत 107 Comments - 245 Shares Empower yourself and others to challenge and change the narrative. Order your copies - Gift them to friends, family, schools and colleges.


Paperback in India via Subbu Publications:

https://subbupublications.com/.../shitala-how-india.../


Outside India on Amazon and Kindle:

https://www.amazon.com/dp/B08XZQJL6B


More reviews:

https://www.tejomayabharat.com/.../catego.../shitala-reviews

54 views0 comments

Recent Posts

See All